Thursday, June 19, 2008

खलिता

खालचं पत्रं खरं तर लिहीलं आहे एका मैत्रिणीसाठी. गेले कित्येक महिने एक laptop विकत घेण्यासाठी मी आणि तिचा भाऊ तिच्या मागे लागलो आहोत. उद्देश हा की voice chat करून तरी भरपूर गप्पा मारता येतील. कारण नाहीतर long distance फोन करून मनसोक्त बोलणं, नेहमीच होतं असं नाही. पण महिनोंमहिने लोटले तरीही laptop घरी यायला काही मुहूर्तच लागत नाहिये. काही ना काही फालतू कारणं! त्यामुळे मी आणि तिचा भाऊ दोघही खूप वैतागलो होतो. एक दिवस त्याबद्दल बोलता बोलता असं ठरलं की बोलून काहीही उपयोग होत नाहिये, तर एक खरमरीत पत्र लिहू आणि म्हणून हे पत्र पोस्टाने (email ने नाही) दिलं पाठवून तिच्या पत्त्यावर.


श्रीमंत उदयराज नाईक-निंबाळकर आणि सौभाग्यवती अलकनंदा उदयराज नाईक-निंबाळकर,


पत्र लिहिण्यास कारण की, एक अतिशय महत्त्वाची कामगिरी पार पाडण्यास आपण उभयतां अती विलंब करीत आहात आणि त्यामुळे होणार्‍या परीणामांचे तीव्र पडसाद देशाच्या फक्त पश्चिम भागातच नव्हे, तर पूर्व भागातूनही उमटायला सुरूवात झालेली आहे, ह्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. कामगिरी काय आहे, ते आपणास चांगलेच ठाऊक असल्याने, त्याची आठवण करून देण्याची आवश्यकता आम्हांस भासत नाही. आजवर अनेक वेळा, त्यासंदर्भात आपणाशी चर्चा करूनही इच्छित कार्य सफल झालेले दिसत नाही. त्यामुळे आमच्या सहनशक्तीचा आता अधिक अंत न पाहता त्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी असा कडक इशारा देण्यासाठी हा पत्रप्रपंच करण्यची वेळ आम्हावर येउन ठेपली आहे.

आपणांस आपल्या जवाबदारीची जाणीव आहे परंतु कार्य तडीस नेण्यासाठी पुरेसा अवधी उपलब्ध नाही अशी जर आपली तक्रार असेल, तर त्यावर आमचे एवढेच म्हणणे आहे की ‘काढल्याशिवाय’ वेळ मिळणे कठीण! आणि ह्या कामगिरीचे महत्त्व जर आपणांस समजले असेल, तर वेळेचे पद्धतशीर नियोजन करून, ह्यासाठी थोडा वेळ बाजूला काढून ठेवणे, आपणांस अवघड जावू नये, अशी माफक अपेक्षा आम्ही बाळगून आहोत.

कामगिरीसाठी लागणारे आर्थिक पाठबळ आपणाकडे नाही अशी जर विवंचना असेल तर तसे तपशीलवारपणे त्वरीत कळवावे. परंतु, श्रीमंत उदयराज नाईक-निंबाळकर ह्याचा कारभार अतिशय सुरळीतपणे चालू असून, आपणांस कशाचीही ददात नसल्याचे समजते. आजच आम्हांस मिळालेल्या माहितीप्रमाणे, श्रीमंत उदयराज नाईक-निंबाळकर ह्यांच्या वार्षिक वेतनात भरगोस वाढ जाहीर झाल्याचेही समजते. जर आपणांस आपल्या कामाचा नियमीत मोबदला मिळण्यास, भोसलेसरकारांकडून दिरंगाई होत असेल तर तसेही स्पष्टपणे (कोणाचीही तमा न बाळगता) कळवावे. भोसलेसरकारांच्या कार्यालयीन प्रमुखाची कानउघडणी करण्याचे आदेश देण्याची व्यवस्था करण्यात येईल. अशा प्रकारच्या तक्रारींमुळे आपणावर कोणतीही आच ओढवणार नाही असे अभय आम्ही आपणास देत आहोत.

ह्याइतर जर कोणती समस्या आपणांस भेडसावत असेल (नेमून दिलेल्या कामगिरीचे संदर्भातच फक्त) तरी सविस्तरपणे कळवावे. त्यावर तोडगा काढण्यासाठी यथाशक्ती मदत देण्याचे आश्वासनही आम्ही ह्या पत्राद्वारे देत आहोत. आम्ही आमच्या शब्दांस जागतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाहीच. त्यामुळे मदतीची अपेक्षा असल्यास निःसंकोचपणे बोलून दाखविण्यास हरकत नाही.

शहाण्याला शब्दाचा मार’ ह्यावर आमचा विश्वास असल्याने आपणाकडून कार्यास कितीही विलंब होत असला तरीही कोणत्याही कायदेशीर कारवाईचे आदेश आम्ही अजून दिलेले नाहीत. ह्याचा मान राखून तातडीने कार्याच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलावीत.

सौभाग्यवती अलकनंदा उदयराज नाईक-निंबाळकर ह्यांचे कनिष्ठ बंधू चिरंजीव धर्मकुमार गायकवाड ह्यानीही ह्यासंदर्भात आमच्याकडे लेखी तक्रार नोंदवलेली आहे. आपणाकडून होत असलेल्या विलंबामुळे त्यांचे वैयक्तिक स्वरूपाचे नु्कसान होत असल्याचे त्यांनी कळवले आहे. जर आपणाकडून त्वरीत कार्यसिद्धी झाली नाही, तर त्यांच्या नुकसानभरपाईसाठी, आपणांस जातीने इकडे येण्याचे आदेश देण्यावाचून, दुसरा पर्याय आम्हांस उरणार नाही, ह्याची दखल घ्यावी. मात्र, अशा प्रकारच्या नुकसानभरपाईदाखल केल्या गेलेल्या मोहिमेसाठी, कोणतेही आर्थिक सहकार्य करण्याची तरतूद आमच्या नियमांत बसत नाही, ह्याचेही भान असू द्यावे.

आमच्या मर्जीविरुद्ध आपणावर कारवाई करण्याची वेळ आम्हावर आणू नये, अशी विनंतीवजा सूचना करून, हे पत्र समाप्त करण्यात येत आहे.


आपली,

सौभाग्यवती सुषमाराजे सयाजीराव सरनौबत.


खूप दिवसांनी (पत्र पोचायलाच बहुतेक तेवढा वेळ लागला) फोन आला. "सौभाग्यवती सरनौबत आहेत का? मी सौभाग्यवती नाईक-निंबाळकर बोलत आहे पुण्यनगरीतून!” नंतर बराच वेळ आम्ही दोघीही हसत बसलो. माझं आडनाव सरनौबत नाही आणि तिचंही नाईक-निंबाळकर नाही आणि ह्या पत्राचाही तिच्या घरी laptop यायला काहीही उपयोग झाला नाही हे वेगळं सांगायची गरजच नाही.


No comments: