एका रात्री अचानक तिचा बाप गेला. बातमी कळताक्षणी ती तडक निघाली. नवराही होताच बरोबर. तोच रस्ता तिच्याघरापासून ते तिच्या बापाच्या घरापर्यंतचा. त्यावरून तिने कितीतरी वेळा जा ये केली असेल. पण त्या दिवशी तिला तो वेगळाच वाटला. काय वेगळं होतं त्या दिवशी? फक्त एक जाणीव. आपला बाप गेला आहे ह्याची. आता तो परत कधीही भेटणार नाही ह्याची. एक भयंकर अस्वस्थ करून टाकणारी जाणीव. सैरभैर अवस्थेत ती बापाच्या घरी पोचली. समोर ठेवलेल्या बापाच्या निश्चेतन देहाकडे बघून तिला भयंकर कसंतरी झालं. आपल्यातली सगळी शक्ती निघून गेली आहे असं वाटलं. इतका वेळ धीराने अडवलेले अश्रू बाहेर आले.
केवढा आधार होता तिला नुसता बापाच्या असण्याचा सुद्धा! बापाचं वय ७७. तिचं ५०. ह्या ५० वर्षात किती तरी वेळा बापनं तिला आधार दिला. सल्ला दिला. बाप म्हणून करायचं ते सगळं काही केलेचं पण त्याहीपेक्षा कितीतरी जास्तं. जगायचं कसं ते शिकवलं त्यानं. कधी मित्रं बनून तर कधी बाप बनून. जेव्हा जेव्हा ती खचली, हरली तेव्हा तेव्हा बापनं तिला धीर दिला. अशावेळी तो साधचं काहीतरी बोलून जायचा आणि तिला त्यातून पुढचा मार्ग दिसायचा. जेव्हा जेव्हा ती जिंकली, यशस्वी झाली तेव्हा तेव्हा बापानं तिचं कौतुक केलं. तिचं छोटसं यशही त्यानं साजरं केलं. त्यापुढे अजून बरचं काही मिळवण्यासाठी तिला सतत प्रोत्साहनही दिलं.
बापचं असणं तिच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. कामाच्या व्यापात दिवसेंदिवस भेट झाली नाही तरीही फोनवरून ५ मिनिटं बोलणं तिच्यासाठी पुरेसं असायचं. जीवनातं काय काय घडतयं ह्याचा तपशील एकदा बापाला दिला की तिला बरं वाटायचं. काही चुका झाल्या असतील तर त्या एकदा बापासमोर बोलून दाखवल्या की तिला हलकं हलकं वाटायचं.
पण आता तो नव्हता. शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहिला आणि एकाएकी गेला. त्याचं वय तसं झालेलं होतं पण तब्येत ठणठणीत होती. आज ना उद्या तो जाणार ह्याची तिला कल्पना होती. पण तरीही जेव्हा प्रत्यक्ष प्रसंग आला तेव्हा तो पेलणं फार अवघड गेलं तिला.
त्या दिवशी स्वतःच्या बापाबद्दल ती जे काही बोलली ते माझ्या बापानं मला सांगितलं. त्यावेळी तो तिथेच होता. मला म्हणाला की मी गेल्यानंतर तू माझ्याबद्दल जे काही बोलली असतीस ते आणि तसचं बोलली ती.
मी हादरले. मला अचानक तिच्या दुःखाची खोली जाणवल्यासारखं वाटलं. माझ्यावरचं तो प्रसंग आला आहे असं क्षणभर वाटलं.
मला माझ्या बापाच्या असण्याचा किती आधार आहे हे जाणवलं. आजपर्यंत कितीतरी अवघड प्रसंग आले माझ्या आयुष्यात. प्रत्येक वेळी माझ्या बापानं मला दिशा दाखवली. काय करू काय नको ते ही सांगितलं. मी ही त्याचं ऐकत गेले आणि माझं भलचं झालं.
त्या दिवशी मी त्याला विचारलं, “तू गेल्यावर मी काय करू? खूपच अवघड होउन बसेल सगळं माझ्यासाठी आणि तू ही नसशील नेहमीप्रमाणे मला सावरायला.”
तो हसला आणि म्हणाला, “अगं, मी आहे अजूनही. नाही जाते एव्हढ्यात!”
मी म्हटलं, “थट्टा सुचतीय तुला? तुला बरयं, तू जाशील निघून. मी कायं करू तेव्हा?”
तो म्हणाला, “काय करणार? २ दिवस दुःख कर आणि मग रोजच्या कामाला लाग. सगळे दैनंदीन व्यवहार चालू कर. मग आपोआप सगळं ठीक होइल.”
मी “बरं” म्हटलं. आणखीन तरी वेगळं काय करण्यासारखं होतं? मला फक्त बरं एवढचं वाटत होतं की माझा बाप जाईल तेव्हाच्या अशक्यप्राय वाटणारया प्रसंगाला कशी सामोरी जाउ ह्याचं उत्तर मी माझ्या बापाकडूनच मिळवलं होतं. आजपर्यंत प्रत्येक वेळी त्याचं ऐकत आले त्यामुळे ह्याही वेळी कितीही अवघड वाटलं तरीही त्याचं ऐकेन असं मनाशी ठरवून टाकलं होतं.
मग विचार आला की रोज ह्जारो जणं मरतात. त्यातले कितीतरी कोणाचे न कोणाचे तरी बाप असतीलच ना? त्यांच्या मुलांनाही असचं वाटत असेल?
1 comment:
मी “बरं” म्हटलं. आणखीन तरी वेगळं काय करण्यासारखं होतं? मला फक्त बरं एवढचं वाटत होतं की माझा बाप जाईल तेव्हाच्या अशक्यप्राय वाटणारया प्रसंगाला कशी सामोरी जाउ ह्याचं उत्तर मी माझ्या बापाकडूनच मिळवलं होतं.
chaan
Post a Comment