Thursday, April 26, 2007

पुतळा

तो पुतळा होता एका राष्ट्रपुरुषाचाज्याने समाजाला अनेक नवीन विचार देण्याचा प्रयत्न केला अशा महान विचारवंताचा

शहरातल्या भर गर्दीच्या चौकात अगदी मध्यभागी उभा असलेलात्याच्या भोवती एक छोटेसे circle. वाहतुकीचे नियंत्रण सोपे जावे म्हणून बांधलेले. पुतळ्याच्या बाजूला circle मध्ये छोटीशी बाग. आखीव रेखीव कापलेली छान हिरवी झाडं, रंगीबेरंगी फ़ुलं आणि त्यामधोमध उभा असलेला तो पुतळालोकांना त्या महापुरूषाच्या विचारांची, त्याने दिलेल्या शांतीच्या शिकवणुकीची सदैव आठवण रहावी ह्या सद्हेतूने बांधलेला..

एका रात्री कुणीतरी त्या पुतळ्याच्या गळ्यात चपलांचे हार घातले. सकाळी जशी वर्दळ वाढायला लागली तशी बातमी सगळीकडे पसरली. लोकं पेटून ऊठली. चर्चा चालू झाल्या. आमच्या नेत्याच्या गळ्यात असा चपलांचा हार घातला जातो म्हणजे काय? केवढा मोठा अपमान आहे हा! ह्या अपमानाचा बदला घ्यायलाच हवा.” नारेबाजी चालू झाली. चिडलेल्या लोकांनी पहिला मोर्चा काढला तो महानगरपालिकेच्या कार्यालयावरसरकारविरोधी घोषणा, बसची तोडफ़ोड, महानगरपालिकेच्या आवारात दगडफ़ेक, बंदची मागणीमग लोकांना आवरायला पोलीस.... लाठीमार झाला. अश्रुधूराची नळकांडी फ़ोडली गेली. लोकं जखमी झाली. दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली. सुरळीतपणे चालू असलेले दैनंदीन व्यवहार ठप्प व्हायला लागले. अस्वस्थतेचे परिणाम सगळ्या शहरात दिसायला लागले. जमाव करून, काठ्या घेउन, घोषणा देत देत लोकं इकडे तिकडे धावायला लागलेदिसेल त्याची तोडफ़ोड करायला लागले. खूप नुकसान झालेवाहनांचे, इमारतींचे, माणसांच्या आयुष्यांचे ज्यांचा ह्या घटनेशी प्रत्यक्षपणे संबंध होता असेही आणि ज्यांचा काहीही संबंध नव्हता असेही हकनाक बळी पडले

ज्या महापुरूषाने शांती, अहिंसा, खरेपणा, माणसामाणसांतली समानता ही तत्त्वे लोकांना शिकवण्यासाठी आयुष्य वेचले, स्वतःच्या आचरणातून आदर्श घालून देण्यासाठी सतत प्रयत्न केले, त्याच्या पुतळ्याच्या अवहेलनेमुळे केवढी ही अशांतता…. केवढी ही हिंसा केवढी ही हानी

काय दिसलं ह्या सगळ्यातून? लोकांच्या मनात त्या समाजसुधारकाबद्दल असलेला आदर? त्याच्या तत्त्वांची केलेली जपणूक? की त्याच्यावरील प्रेमापोटी त्याच्याच तत्त्वांना घातलेली मुरड? की फ़क्त सद्सद् विवेकबुद्धीचा अभाव? पैशाचा, वेळेचा आणि मालमत्तेचा अपव्यय? की विचार करता विध्वंसक होणारी mob mentality?

का हे सगळं एक कूट षडयंत्र असावं? सत्ताधारी पक्षाला खाली खेचण्यासाठी, त्यांच्या कारकीर्दीत किती अराजक माजले आहे हे लोकांना दाखवून देण्यासाठी घडवून आणलेलं नुसतं एक नाटक? सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतील अशा लोकांनी मुद्दामून ऊठवलेलं एक वादळ? पण मग त्यासाठी एवढी हिंसा? एवढी हानी?

खरं तर त्या समाजसुधारकाने केलेले कार्य एवढे मोठे आहे की काही चपलांच्या हारांनी त्याचं महत्त्व कधीच कमी झालं नसतं. लोकांच्या मनातलं त्याच्याबद्दलचं आदराचं स्थान कधीही ढळलं नसतं

ज्यांना त्या महापुरूषाने दिलेली शांती, अहिंसा, खरेपणा, माणसामाणसांतली समानता ही तत्त्वे खरोखरी समजली, उमगली, त्यांना ह्या सगळ्या घटनांमधला विरोधाभास आणि विपर्यास जाणव असेल. हा सगळा मूर्खपणा आहे असे मनोमन वाटतही असेल. अशा प्रकारांतला फ़ोलपणा समजतही असेल. फ़क्त तो समाजातल्या सर्व थरातल्या लोकांपर्यंत पोचवायला हवा. अशा प्रकारे महानगरपालिकेवर दगडफ़ेक करून, बसेसची जाळपोळ करून, मालमत्तेचे नु्कसान करून काहीही साध्य होऊ शकणार नाही.वेळ आणिपैसाह्या दोन्हीही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी अशा प्रकारे वाया घालवण्यात काही अर्थही नाही, हे जर सर्वांपर्य़ंत प्रभावीपणे पोचू शकले, पटवून देता येऊ शकले, तर कदाचित भविष्यात अशा घटना घडणारही नाहीत.

1 comment:

रोहित said...

मला दहावीतला धडा आठवला. जनार्दन वाघमारेंचा "महापुरुषांचा पराभव". महापुरुषांचा पराभव त्यांचे अनुयायीच करतात. महापुरुष जाताना मागे ठेवून जातात त्यांच्या तत्त्वज्ञानांचे फक्त सांगाडे. बाकी काही नाही.
तुमची अनुदिनी आवडली. लिखाण असंच चालू ठेवा. त्यानिमित्ताने तुमचा छंदही चालू राहील आणि आम्हांलाही काहीतरी चांगलं वाचायला मिळेल.